हुतात्म्यांच्या स्मृती पुसल्या जात
असताना...!
सोलापूर हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक
वारसा असलेलं महाराष्ट्रातील शहर... एकेकाळचं गिरणगाव आणि आत्ताचं एक स्मार्ट सिटी
होण्यास आसुसलेलं शहर... येथे अनेक जाती धर्माचे लोक राहतात... जसा की एक छोटा
भारत देशच वसतो इथे... मराठी,
हिंदी, उर्दू,
कन्नड, तेलुगू या इथल्या लोकांच्या भाषा... दक्षिणेकडील
राज्यांचं प्रवेशद्वार... चारही दिशांनी जाणारे राष्ट्रीय महामार्ग... नानाविध
कारखाने, टॉवेल, सतरंजी, बिडी हे शहरातील मुख्य व्यवसाय... पण ‘सोलापूरी चादर’
ही चादरीमुळं शहराला मिळालेली एक खास
ओळख... पण या आधीची एक ओळख आहे ती म्हणजे 'हुतात्म्यांचे शहर’!
देशाच्या स्वातंत्र्याच्या १७ वर्षापूर्वी
म्हणजेच ९, १०, ११
मे १९३० रोजी सोलापूर शहरानं ३ दिवसाचं स्वातंत्र्य अनुभवलं... या घटनेमुळं
स्वातंत्र्य संग्रामा दरम्यान मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ
शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा या चार
जणांना १२ जानेवारी १९३१ रोजी इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली. या
क्रांतिपर्वामुळंच सोलापूरला ‘हुतात्म्यांचे शहर’ म्हणून ओळखलं जातं...
आज मात्र याच हुतात्म्यांच्या स्मृती
काळानुरूप काहीशा पुसट होत चालल्या आहेत,
पुसल्या जाण्याच्या
मार्गावर आहेत... आजचा गोल्डफिंच पेठ /नवी पेठ या शहरातील मुख्य बाजारपेठेच्या
भागात चार यापैकी एक हुतात्मा जगन्नाथ भगवान शिंदे यांचं स्मृती निवास आहे...
येणाऱ्या पिढीला या हुतात्म्यांची आणि त्यांच्या हौतात्म्याची आठवण कायम स्मरणात
राहावी म्हणून सोलापूर महानगरपालिकेनं त्याचं पालकत्व घेतलेलं आहे... पण आज तुम्ही
तेथे जाल तर घराची दुर्दशा पाहून मन नक्कीच खिन्न आणि अस्वस्थ होतं... सर्वत्र
अस्वच्छता, बकालपण... याकडे ना महानगरपालिकेचे
लक्ष, ना येथील नागरिकांना याचं सोयरसुतक...
आज या स्मृती निवासाच्यासमोर टोलेजंग इमारती,
दुकानं आहेत पण नेहमी
- नेहमी पाहून या स्मृती निवासाबद्दल आपुलकीच शिल्लक राहिली नाही वाटावं असं एकंदर
चित्र... या सगळ्या गोष्टी पाहून मनात एक गोष्ट येते की, आपल्या शहराच्या या स्मृती अशाच कालौघात विस्मृतीत
जाऊ देणार आहोत का आपण?
नाही ना? याला आपण सर्वांनीच जपायला हवं...
आपल्याला दृश्य बदलण्यासाठी आधी दृष्टिकोन
बदलण्याची गरज आहे... हुतात्म्यांच्या स्मृती जागविण्यासाठी आज हुतात्मा होण्याची
आवश्यकता नाही... कारण आज आपला भारत देश स्वतंत्र झालाय... गरज आहे ती या चार
हुतात्म्यांचं हौतात्म्य मनात कायमचं कोरण्याची... त्यावर कधीही विस्मृतीचा थर
साचू न देण्याची... त्यांची स्मृतीस्थळं जपण्याची... येणार्या पिढीसमोर या शहराचा
अलौकिक इतिहास जागृत ठेवण्याची...
जय हिंद!
© राजकिरण_चव्हाण.
मो. 7774 88 33 88
Meet me on

