दैनिक दिव्य मराठी दिनांक ५.१०.२०१८ रोजी आलेला लेख

आज जगभरात जागतिक शिक्षक दिन साजरा केला जात आहे. इ. स. 1994 पासून हा दिवस 100 हून अधिक देशात साजरा केला जातो. भावी पिढी सक्षम,समर्थ बनविण्यासाठी आधी शिक्षकांना सक्षम व समर्थ बनवणे हा या मागचा उद्देश समोर ठेऊन युनेस्कोतर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो. शिक्षणात आज होत असलेले बदल याचा विचार करताना एव्हाना 'व्हर्च्युअल क्लास' ही संकल्पना समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. व्हर्च्युअल क्लास हा शब्द खूप रुळाला असला तरी व्हर्च्युअल क्लास म्हणजे काय? त्याचे कोणते फायदे आहेत? त्याची व्याप्ती आणि मर्यादा आदी बाबी समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून 'व्हर्च्युअल क्लास' या संकल्पनेवर प्रकाश टाकणार आहोत.
व्हर्च्युअल क्लास म्हणजे काय? याचं जर मराठीत उत्तर सांगायचे झाले तर ते म्हणजे 'अभासी वर्ग'. थोडक्यात काय तर प्रत्यक्षात जरी या ठिकाणी शिकवत नसले तरीही प्रत्यक्षात शिकण्यासारखा अनुभव देता व घेता येतो. शिक्षणात अनेक बदल होत आहेत त्याचा एक भाग म्हणजे 'व्हर्च्युअल क्लास'. शिकवताना विद्यार्थ्यांना अनेक अनुभव द्यावे लागतात. कधी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन मुलांना शिकवण्याचा अनुभव द्यावा लागतो. त्यावर एक चांगला पर्याय म्हणून अशा क्लासकडे पाहता येईल. कारण अनेक गोष्टी, संकल्पना वर्गात आणणे, दाखवणे शक्य नसते, अनेक अमूर्त कल्पना विद्यार्थांना समजावतानाही खूप अडचणी येतात. तेव्हा हा क्लास उपयुक्त ठरतो. बरं हा क्लास सुरु करायचा असेल तर कमीतकमी कोणती साधनं लागतात? तर याचं उत्तर आहे 'मोबाईल'. अगदी मोबाईलद्वारेही हा क्लास घेता येतो. लॅपटॉप, प्रोजेक्टर आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध असेल तर उत्तमच. व्हर्च्युअल क्लासमुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही नवीन शिकण्याची संधी मिळते. यातून अर्थात शिक्षकांना टेक्नोसॅव्ही /तंत्रस्नेही बनवण्याचा आनंद मिळतोच त्याचबरोबर ज्यांना आपल्या शाळेतील मुलांना काहीतरी नवीन देण्याची इच्छा असते त्यांना या माध्यमातून देता येते आणि 'क्वॉलिटी एज्युकेशन' देण्यासही हातभार लागतो.
आज जगभरात व्हर्च्युअल क्लास हा संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात रुजू लागली आहे आणि मोबाईल, लॅपटॉप या गोष्टीचा शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीमुळे या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या आहेत. यामुळे व्हर्च्युअल क्लाससाठी खूप खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही. ग्रामीण-शहरी असा भेदही यामुळे कमी झाला आहे. या क्लासच्या माध्यमातून एखादी व्यक्ती मोबाईल किंवा कॅमेर्याच्या समोर शिकवत असते तर शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी हे सर्व मोबाईल, टॅब, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरुन ऐकून, पाहून शिक्षण घेत असतात. प्रत्यक्षात समोर जरी कोणी नसले तरी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी उपलब्ध होते. आज जगभरातून कोठूनही आणि कोठेही या क्लासच्या माध्यमातून पोहोचू शकतो. भारत किंवा महाराष्ट्राचा विचार करता आज आपल्या सोलापूर जिल्ह्याने बरीच आघाडी घेतल्याचे एकंदर चित्र पाहायला मिळते. कारण येथे एकट्या प्रिसिजन कंपनीने आपल्या CSR च्या माध्यमातून 100 पेक्षा जास्त शाळा डिजिटल स्मार्ट केल्या आहेत. अनेक शाळांमध्ये लॅपटॉप, प्रोजेक्टर आदी डिजिटल साधनं उपलब्ध आहेत. यापुढेही जाऊन असे म्हणता येईल की, जवळजवळ प्रत्येक शिक्षक, पालक यांच्याकडे स्मार्ट फोन उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात तर ग्रामपंचायत सदस्य, गांवकरी यांची शाळेबद्दलची 'अटॅचमेंट' वाढली आहे. याच्यापुढे जाऊन सोलापूर मधील रणजितसिंह डिसले आणि विजयकुमार वसंतपुरे या शिक्षकांनी व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप (अभासी सहल) ची सफर घडवून आणली आहे. जि. प. सोलापूरच्या पुढाकाराने सायन्स सेंटर यांच्यामधील डायनॉसोर पार्क, टेक्स्टाईल पार्कच्या ट्रीपमध्ये जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील 500 शाळांनी भाग घेतला आहे. यापुढेही जाऊन 'गड आला पण सिंह गेला' असे इतिहासातील धडे प्रत्यक्ष सिंहगडावर व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप च्या माध्यमातून शिकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाळेतच बसून अतिशय उच्च दर्जाचे अनुभव विद्यार्थी विनामूल्य घेऊ शकतील.
शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही म्हणून स्वतःची ओळख तयार करण्याची चांगली वृत्ती वाढत आहे. त्यामुळे विविध विषयांवर प्रभुत्व असणारे शिक्षक आपले अनुभव इतरांना व्हर्च्युअली शेअर करत आहेत. हा क्लास फक्त प्राथमिक, माध्यमिक शिक्षणापुरता नसून अनेक खासगी शिकवणीतही हे क्लास आयोजित करण्यात येत आहेत. विविध विषयांचे तज्ज्ञ स्वतःच्या शहरातूनच विविध शहरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. पर्यायाने यातून डिजिटल इंडिया मोहीमेला बळकटी मिळत आहे.
मोबाईल उपलब्धता नसणे, नेटवर्क नसणे आणि प्रत्यक्ष स्पर्श घेऊन ज्ञान मिळवण्याचा अनुभव न मिळणे या काही मर्यादा असल्या तरी अल्पखर्चात अमूर्त संकल्पना समजावणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जगाच्या स्पर्धेत उतरता येणे, शहरी व ग्रामीण भेद नसणे या बरोबरच सहजपणे, परिणामकारकरीत्या अध्यापन करता येणे या खूप अशा याच्या जमेच्या बाजू आहेत.
शेवटी काय व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून सोलापूर सध्या देशात आघाडी घेतल्याचे चित्र आहेच जवळपास 90% शाळांपर्यंत हा क्लास चालू करता येण्यासारखे आहे. चला तर मग व्हर्च्युअल क्लास च्या माध्यमातून मुलांना जागतिक, उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा संकल्प करुया. स्मार्ट सोलापूरच्या नावाला याद्वारे अधिक स्मार्ट करण्याचा प्रयत्न करुया आणि जगभरात सोलापूरचे नाव उंचावूया.

© श्री राजकिरण चव्हाण
सृजनशील शिक्षक तथा राज्य तंत्रस्नेही शिक्षक
श्री समर्थ विद्यामंदिर, सोलापूर
Mail-srujanrajkiran@gmail.com
Blog:- http://srujanshilshikshak.blogspot.com/
7774883388

Meet me on
 Instagram     facebook     Twitter    WhatsApp     YouTube


Post a Comment

Previous Post Next Post