सजग पालकत्व व मुलांवरील संस्कार

 
   बालपण हे संस्कार घडविण्याचं वय असतं. या काळात होणारे संस्कार आयुष्याच्या शेवटपर्यंत सोबत करतात. म्हणून बालपण हाच जीवनाचा पाया असतो. त्या वयात मिळणार्‍या शिदोरीवर आयुष्याची इमारत उभी राहते. अस्तित्व आणि प्रगती ही आपल्या जीवनरथाची दोन चाकं. अस्तित्व टिकवण्यासाठी आरोग्य तर प्रगतीसाठी ध्येय निश्चित करावं लागतं. आरोग्य, ध्येय कसं मिळवायचं? अडचणी आल्यास त्यावर कशी मात करायची? यासाठी आवश्यक मूल्ये आपल्या पाल्यात उतरविणं म्हणजेच सजग पालकत्व होय. परंतु, मुलावर होणारे संस्कार कमी पडत चालले आहेत. सहज उपलब्ध होणारे पैसे, लहानपणापासून होणारे लाड, कष्टाच्या कामाचा अभाव, रोजच्या जीवनात समाजमाध्यमांचा सतत सुरू असणारा भडीमार, पालकांची अनास्था, हरवत चाललेला संवाद यातून चंगळवाद वाढत आहे. ही धोक्याची घंटा आहे. पालकांनी आज सजग होण्याची गरज आहे.
    आपल्या मुलांना रोजच्या खर्चासाठी देण्यात येणारा पॉकेटमनी कोणत्या कामासाठी खर्च केला जातो?, त्याची दोस्तकंपनी कोणती आहे?, शाळेच्या वेळेत तो वर्गात असतो का?, शिक्षक व मित्राशी त्याची वागणूक कशी आहे?, शाळा सुटल्यानंतर तो कुठे असतो?, मोबाईलवर तो कोणाशी चॅटिंग करतो?, त्याच्या मित्रांच्या सवयीवरही आपल्याला नजर ठेवावी लागणार आहे. सध्याच्या जमान्यात मुलांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली दुर्लक्ष करणं घातक आपल्यासाठी ठरू शकतं.


    बदलत्या जीवनशैलीचा परिणाम प्रत्येकावर होत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा भडिमार होत आहे. यातून विद्यार्थीदेखील गुरफटत आहेत. विविध गेम्स, ॲप्स माध्यमातून त्यांच्यात गुन्हेगारीवृती भिनत चालली आहे. यासाठी संवाद वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या २१ व्या शतकात मुलांचं संगोपन करतांना पालकासमोर नवी आव्हानं उभी ठाकत आहे. त्यामुळं बदलतं पालकत्व जाणून घेण्याचंही आव्हान आपल्याला पेलावं लागणार आहे. असं म्हणतात की, संस्काराच्या मजबूत पायावर युगपुरुष घडतात. शिवाजी, संभाजी, बाजी, तानाजी, मुरारबाजी असे अनेक कीर्तिवान पुरुष संस्काराच्या भक्कम पायावर हिंदवी स्वराज्य उभं करू शकले. आज आपण पालक ‘संस्कार’ म्हणून काय शोधतोय? हे आपलं आपल्यालाच माहित नाही. शाळेच्या सुट्टीच्या महिन्यात संस्कार क्लासेसमध्ये आपल्या पाल्याला ‘सुसंस्कारित’ करण्यासाठी आजचे पालक हजारो रुपये देतात. संस्कारवर्गाच्या फी चे आकडे ऐकले की, झोप उडते.

“बेधुंद जगाच्या अंधकारी मिरवीत असे अज्ञान
अन मग, अज्ञानाचे फिरता वारे शोधीत असे संस्कार”

    आजचं युग जसं संगणकाचं युग म्हणून ओळखलं जातं तसं ते धावपळी, धकाधकीचंसुध्दा आहे. जो तो एखाद्या यंत्राप्रमाणं आज काम करीत आहेत. भरपूर पैसा कमावणं आणि त्यातून पोटच्या गोळ्यांना सुखी व आनंदी ठेवण्यासाठी आई-वडील हे दोघंही विविध क्षेत्रात नोकऱ्या करीत आहेत. घरातील चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिलांनी देखील कुटुंबाच्या प्रगतीसाठी घराबाहेर पाऊल ठेवलं आहे. हा बदल देशाच्या प्रगतीसाठी निश्चितच अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे; परंतु या बदलात्मुळं घरात काही समस्याचाही जन्म झाला आहे, याकडं दुर्लक्ष करून कसं चालेल? महिला नोकरी करू नयेत किंवा त्यांनी फक्त घरची कामंच करावीत असंही नाही. परंतु दोघंही नोकरी करणाऱ्या कुटुंबात तणावाचं वातावरण दिसून येतं, हे सत्य स्वीकारावंच लागेल.

    ज्या घरात पुरुष आणि स्त्री या दोघांचं योग्य समायोजन होतं तिथं शांतता सुध्दा दिसून येते हे ही खरंच आहे. पण ते फारच अल्प काळ टिकून राहण्याची भीतीसुध्दा असते. या कामाच्या व्यापात, धावपळीत आपल्या पोटच्या गोळ्यावर संस्कार करायचं राहून चाललं आहे; असं काही ठिकाणच्या अनुभवावरून वाटतं. ज्यांच्या जवळ खूप पैसा आहे त्यांना वाटतं की, पैशाच्या बळावर सर्व काही मिळविता येतं परंतु त्यांना हे माहिती नाही की, पैशाच्या बळावर संस्कार मिळविता येणार नाही. ‘संस्कार’ हा जीवनाचा अनमोल ठेवा आहे आणि त्यांची रुजवण बाळ गर्भात असल्यापासून करावी लागते. बालपणी मुलांवर जे संस्कार होतात ते आयुष्यभर त्याच्या सोबत असतात. चिरकाल टिकणारे संस्कार योग्य प्रकारे झाले तर त्याचे अनुकूल परिणाम पहावयास मिळतात. गर्भपासून ते मूल समजदार होईपर्यंत त्यांची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. त्यामुळं वयाच्या १० व्या वर्षापर्यंत मुलांकडं विशेष लक्ष देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होतील याकडं प्रत्येक पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

    आपले पारंपरिक सण वा उत्सव यातून मुलांवर सामाजिक तसेच कौटुंबिक संस्कार टाकता येतात. सण साजरे करतांना त्यातून मुलांवर संस्कार कसे टाकता येतील याचा विचार करून जर कार्यक्रम साजरे केल्यास तिथे एक वेगळाच आनंद अनुभवास येतो. त्याचप्रमाणं मुलांना याच वयात स्वावलंबनाची शिकवणही द्यायला हवी. जसं की, घरात इतरत्र पडलेल्या वस्तू उचलून जागेवर ठेवणं, अंथरुण व पांघरूणची घडी करून ठेवणं, घर टापटीप ठेवणं, पाणी भरण्यासाठी व घराची झाडलोट करण्यासाठी आईला मदत करणं, घराबाहेर वडिलांच्या कामात मदत करणं यांसारखी कामं करणं जी लहान दिसतात, पण खूप महान कार्य करून जातात. लहानपणापासून दिलेले हे स्वावलंबनाचे धडे मुलांना पुढील आयुष्यात निश्चितच उपयोगी पडतील. नवरा बायको यांनी घरात वावरत असताना प्रेमानं आणि आपुलकीनं वागावं. त्या वागण्याचा परिणाम मुलांवर होत असतो. म्हणून लहान वयात मुलांवर योग्य संस्कार करणं ही एकप्रकारे हिऱ्यांच्या खड्यावर केलेली प्रक्रियाच आहे. या संस्कारामुळे त्यांचं जीवन हिऱ्यांप्रमाणं चमकत राहते.

आजच्या युगात प्रत्येक मनुष्य हा संस्कार हे काहीतरी सराफाच्या दुकानात काही ग्रॅममध्ये मिळणारी वस्तू आहे, अशा आविर्भावात त्याच्या अथक शोधात फिरताना दिसतो. जे काय ते सगळं स्टेट्सचं माप लावून अभ्यास, संस्कार विकत घ्यायचंच ध्येय असतं ह्यांचं. काही सुशिक्षित आणि सुधारित म्हणवणाऱ्या मंडळींची बहुतेक ही कल्पना असते, की संस्कार हे सुट्टीच्या महिन्यांत आटपणारं शुल्लक काम आहे. एखाद्या उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत कधीतरी एकदा हे काम आटपून टाकू म्हणजे झालं. अशा पालकांचा अट्टाहास पाहता मला तर हसावं की, रडावं तेच कळत नाही.

पण खरंच संस्कार म्हणजे नक्की काय? योग्य आचार-विचार, गुण-अवगुण हे ओळखण्याची क्षमता म्हणजे संस्कार? की जीवनात मनाला कधीही अहंकाराची बाधा होऊ न देता विनम्र असणे म्हणजे संस्कार? त्या कस्तुरीमृगासारखी तर आपली कथा झाली नाही ना? म्हणजे कस्तुरी स्वतःकडे असूनही त्याची जाणीव मात्र आपल्याला नाही. संस्कार शोधायला गेल्यावर, हाती नक्की काय लागतं हे मोठ प्रश्नचिन्ह (?) आहे. आयुष्य समृद्ध, यशस्वी होण्यासाठी मदत होते. जसं एखाद्या रत्नाला पैलू पाडल्यानंतर ते रत्न पूर्वीपेक्षा तेजस्वी होतं किंवा एखाद्या चित्रात रंग भरत गेल्यावर ते जसं उठावदार व सुंदर दिसतं, तसं संस्कारांचा मनावर असामान्य परिणाम होऊन दिव्य तेजाचा उदय होतो. शेवटी निरोगी, सात्विक, धैर्यशील व सामर्थ्यवान पीढी घडवणं हेच तर असतं संस्कारांचं ध्येय, नाही का?भावनिक वातावरण ही मुलांची मूलभूत गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांइतकीच ती महत्त्वाची. मुलांना भावनिक आधार देणं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करणं, त्यांना समजून घेणं, त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करणं, प्रेम आणि विश्वासाचं नातं निर्माण करणं अशा काही बाबी या भावनिक वातावरणात मोडतात. भावनिक स्थैर्य ही काळाची गरज आहे आणि एक सजग पालक म्हणून आपली जबाबदारीही.

मुलांच्या शारीरिक वाढीसाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातात. जाहिरातीही त्यावर अधिकाधिक भर देत असतात. कपडे, पूरक आहार, औषधं इत्यादीविषयी सतत काही ना काही सांगितलं, बोललं जातं. मात्र, त्यात मुलांच्या भावनिक बाजूचा कितपत विचार केला जातो? भौतिक सुविधांच्या कोलाहलात भावनांचा कोंडमारा होतोय. त्यांना भावनिक वातावरण पुरवण्यात आपण यशस्वी झालेले असतो का? भावनिक वातावरण ही बदलत्या काळातली महत्त्वाची गोष्ट आहे.

त्यासाठी खालील काही गोष्टी सजग पालक म्हणून करायलाच हव्यात.
१. दूरच ठेवायला हवं मुलांना गृहकलहांपासून!:  आई-बाबा, कुटुंबातील इतर व्यक्ती यांच्यातील रुसवा फुगवी, भांडणं यांचा मुलांच्या भावनिक आयुष्यावर परिणाम होतो. भावनिक विश्व उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणून मोठ्यांनी मुलांना कलहापासून दूर ठेवलं पाहिजे. मुलांवर वाईट परिणाम होणार नाही ना, याची काळजी आधी घ्यायला हवी. मोठे होतानाची आपली समज अशा ठिकाणी वापरली पाहिजे.

२. स्वैराचार नको, स्वातंत्र्य द्या : आपल्या मुलांना स्वातंत्र्य द्या परंतु ते त्यातून स्वैराचार करणार नाहीत इथपर्यंत त्यांना स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यामुळं मुलं आपल्या कल्पनांना मुक्तपणे मांडू शकतात परंतु स्वातंत्र्य स्वैराचारात बदलणार नाही याची काळजीसुद्धा आपण घेणं गरजेचं आहे.

३. शिकू द्या चूकांपासून :   कोणतीही गोष्ट करताना चुका होणारच. या चुकातूनच त्यांना नवीन गोष्टी कळणार, समजणार आहेत. परंतु हे सर्व एका वयाच्या मर्यादेपर्यंत. पण ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी लागू नाही होणार. ज्यावेळेस मुद्दामहून, समजूतदारपणे, समंजसपणे चुका केल्या जातात तर त्यांना पांघरून घालता कामा नये. कारण काही वेळेस चुकांना पांघरून घालणं घातक ठरू शकतं. त्या त्या वेळेस मुलांच्या चुका दाखवणं हे देखील एक सजग पालक म्हणून आपलं कर्तव्यच आहे.

४. शिकवायला हवं भावनांचं समायोजन करणं! :  मुलं भावनेच्या भरात काही गोष्टी करतात. खरं तर वय वाढत जाईल तशी समज वाढते. ही समज वाढायला आपणच मदत केली पाहिजे. भावनांना आवर घालावा कसा, विचार करून कृती करावी कशी? हे मुलांना सांगायला हवं. मात्र तेही सकारात्मक. नाहीतर आपली चुकीची शिकवणच मुलांची सवय बनेल. 

५. देऊ अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आणि संधी! :  पालकांनी त्यासाठी पाल्यांना स्वत:चं मत मांडण्याची संधी द्यावी. येथे कुटुंबात मुलांना फारसं विचारातच घेतलं जात नाही. ते लहान आहेत त्यांना काय समजतं असं समजलं जातं. मुलं आपल्यावर असल्यानं त्यांच्या मतांना किंमत नसते. खरंतर स्वातंत्र्य, संधी देण्याने मुलं अधिक सक्षम, जबाबदार बनतात हेही लक्षात घ्यायला हवं. 

६. काही नाही साधत हो तुलना केल्यानं! :   एकदा मला असं एकजण म्हणाला. “सृजनपेक्षा स्वराज छान दिसतो” ही तुलनाच खरं तर निरर्थक होती. या अशा तुलना करून आपण नेमकं काय साधतो? उलट प्रत्येक मूल वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण आहे याची आपल्याला जाणीव असायला हवी. मुलांच्यात हुशारी, गुण, रूप, रंग, कला इत्यादींवरून तुलना करणं टाळायला हवं. आपणच मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतो. उलट त्याचा स्वीकार हा त्याला आयुष्यात भरारी घेण्यास मदतच करतो.
 
७. घट्ट वीण करू प्रेम आणि नात्यांची! :  प्रेमानं नाती घट्ट होतात. डोक्यावरून मायेनं हात फिरवला, नवीन काही करून पाहिलं तर पाठीवर शाबासकी देणं, पप्पी घेणं, घट्ट मिठी या सहज सोप्या गोष्टी मुलांच्या खूप जवळ नेतात. नात्यांची वीण घट्ट होते. सजग पालक म्हणून ती आपली मोठी जबाबदारी घेणं आवश्यक आहे.

८. टाळायला हवं बाजू घेणं! :  दोन भावंडं जेव्हा भांडण करतात तेव्हा दोन्हींची बाजू ऐकून घ्यायला हवी. चूक कोणाची हे समोर ठरवलं जायला हवं. अन्यथा दोघांची बाजू ऐकून न घेता आपण एकाच मुलाची बाजू घेतली तर हा दुसऱ्या मुलावर एक प्रकारे अन्याय असतो. अशानं आपल्या मुलांच्या मनात आपली वाईट प्रतिमा तयार होऊ शकते. त्या पुढं जाऊन घातक ठरू शकतात. तेव्हा दोन्ही मुलांना ऐकून मगच निर्णय द्या. आपल्या मुलांवर विश्वास असावा. मात्र तो विश्वास फाजील, आंधळा असू नये. 

९. करू आदर मुलांचाही!: प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असतं. मोठ्या व्यक्तींचा जसा आदर, सन्मान झाला पाहिजे तसाच तो लहान मुलांचाही झाला पाहिजे. कारण मिळालेला आदर, सन्मान त्यांची स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यासाठी उपयोगी पडतो. नेहमी नकारात्मक बोलणी, दोष देणं, नावं ठेवणं यामुळं मुलांचं अक्षरशः व्यक्तिमत्त्वं करपून जातं हो. ही मुलं जीवनात उभारी घेण्याचं धाडस करत नाहीत. मुलांचा आदर, सन्मान करणं हे देखील बदलत्या पालकत्वाचं महत्त्वाचं लक्षण आहे.

सध्या कोरोनाचं संकट आहे. शाळेलाही सुट्ट्या आहेत. परंतु या संकटाला आपण संधी म्हणून आपल्या पाल्यांना काही चांगल्या गोष्टीची माहिती देऊ शकतो. काही नवीन गोष्टी शिकवू शकतो आणि एक क्वालिटी टाइम त्याच्याबरोबर घालवण्याची आपल्याला संधी या संकटात सुद्धा साधता आली पाहिजे.

अनेक चांगल्या गोष्टी मुलं आपल्या पालकांकडून शिकत असतात. चित्रकला, हस्ताक्षर, कॅलिग्राफी, काही गोष्टीवरती स्वतःचं मत मांडणं या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. मी ‘शिक्षणात तंत्रज्ञान’ दैनिक सकाळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सदर चालवतोय. तुम्हाला वाटलं असेल की, मी हे सांगतो कशाला? परंतु त्याचा उद्देश एक आहे की, याचा फायदा माझ्या मुलांमध्ये त्या गोष्टी रुजण्यासाठी झाला.

उदाहरणच द्यायचं झालं तर माझा मोठा मुलगा सृजन कॉम्प्युटरवरती खूप चांगल्या पद्धतनं चित्र रेखाटतो. अगदी मोठ्या माणसाला लाजवेल अशा गोष्टी तो कॉम्प्युटरवरती करत असतो. चित्रकलेच्या स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला. त्याच्यात असणाऱ्या कलागुणांना वाव मिळाल्यानं त्याचा गौरव झालाच, पण त्याच्या वर्गातील एकंदर कामगिरीमुळं यावर्षीचा ‘आदर्श माता पिता पुरस्कार २०१९-२०’ आम्हा दाम्पत्यांना मिळाला. यामुळं खूप समाधान मिळालं.

एक सजग पालक म्हणून आपल्या मुलांसमोर आपण काय सादर करतोय हे देखील महत्त्वाचं आहे. मला मान्य आहे की, सजग पालकत्व व मुलांवरील संस्कार ही तारेवरची कसरत आहे. सजग पालक म्हणून अनेक गोष्टी करणं गरजेचं आहे, त्या सगळ्याच गोष्टी मला करणं शक्य नाहीये. पण ज्याच्या गोष्टी करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो.

सजग पालकत्व जपताना मुलांची अतिकाळजी न करणं देखील महत्वाचं आहे. कारण मुलांची अतिकाळजी केल्यानं मुलं अधिक नाजूक, अधिक परावलंबी बनतात. काहीवेळेस ‘मुद्दाम’ काळजीपूर्वक न पाहण्याचा प्रयत्न मी करत असतो. यातून मुलं येणाऱ्या परिस्थितीशी समायोजन करणं शिकतात, त्यातून तयार होत असतात. त्यामुळं याठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं फायदेशीर ठरतं.

“ इथल्या मातीत जे रुजतात
आईच्या गर्भात जे वाढतात
तेच संस्कार या भारतातले
जगात सर्वश्रेष्ठ ठरतात ”


या लेखाबद्दल आपल्याला काही कमेंट करायचे असेल तर खालील Post a Comment मध्ये तुम्ही ते नोंदवू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post